अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट केरळ सायबर वॉरियर्सनी हॅक केली आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेवर तीन गोळ्या झाडल्या. तसेच नथुराम गोडसे जिंदाबादचे नारे दिले आणि मिठाईही वाटली. या कृतीचा निषेध म्हणूनच हिंदू महासभेची वेबसाइट केरळमधल्या या ग्रुपने हॅक केली आहे.
या वेबसाईटवर आता हिंदू महासभा मुर्दाबाद असा संदेश लिहिण्यात आला आहे. तसेच महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग आपल्याला दाखवला. महात्मा गांधींच्या विचारांमुळे देशाला दिशा मिळाली. ते आपले राष्ट्रपिता होते आणि त्यांचे विचार कायमच प्रेरणादायी ठरतील या आशयाचा संदेश या वेबसाइटवर लिहिण्यात आला आहे. आता ही वेबसाइट हॅक करण्यात आली आहे.
काय घडले होते?
गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती.
पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महासभेशी जोडलेला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 5:39 pm