उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका दांपत्याला पासपोर्ट देण्यासाठी धर्म बदलण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. दांपत्याने या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. आता परराष्ट्र मंत्रालयाने लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच, हे प्रकरण अंगाशी येताना दिसल्यानंतर रिजनल पासपोर्ट ऑफिसरने कर्मचाऱ्याची चुकी मान्य केली असून दांपत्याला पासपोर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका महिलेने पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा आरोप केला होता. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता, त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रारही केली होती.


बुधवारी पासपोर्ट कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले असताना मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने अनस सिद्दीकी यांना धर्मांतर करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने त्यांच्यावर आरडाओरड सुरु केली. या वागणुकीमुळे धक्का बसलेल्या दांपत्याने सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार करत मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. अनस आणि तन्वी यांचं २००७ मध्ये लग्न झालं आहे. त्यांनी सहा वर्षाची मुलगी आहे. दोघेही नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करतात.