शबरीमला येथील अय्यपा मंदिर व्रिसचिकोम या मल्याळम महिन्याच्या पहिल्या दिवशी खुले करण्यात आल्यानंतर हजारो भक्तगणांनी तेथे पूजाअर्चा केली. दरम्यान हिंदू अकिया वेदी संघटनेच्या  नेत्यास ताब्यात घेतल्याच्या विरोधात बारा तासांचा हरताळ पाळण्यात येत आहे. पहाटे तीन वाजता मंदिर उघडल्यापासून तेथे रांगा लागल्या आहेत. दोन महिन्यांच्या वार्षिक यात्रेसाठी मंदिर शुक्रवारी खुले झाले तरी तेथे पाळीच्या वयोगटातील महिलांना प्रवेशास विरोधच आहे. शनिवारी सकाळी सर्व पूजापाठ सुरू करण्यात आले. त्यावर वासुदेवन नंबुद्री यांची देखरेख होती. कडक बंदोबस्तात केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बस निलाकल येथून पंबाला येथे येत होत्या. कुठलीही वाहतूक थांबवण्यात आलेली नाही.  हरताळ आंदोलनामुळे तिरूअनंतपुरम येथे रूग्ण मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात पोहोचू शकले नाहीत. काही रूग्ण कर्करोग उपचार केंद्रात जाऊ शकले नाहीत.

मंदिराच्या परिसरातील दुकाने व हॉटेल्स खुली आहेत. राज्यात इतरत्र हरताळ पाळला जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळ राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टॉमिन जे थाचनकरी यांनी सांगितले, की शबरीमला येथे पोलिस बंदोबस्तात बस पाठवण्यात येत आहेत. तिरूअनंतपुरम येथील बलरामपुरम येथे निदर्शकांनी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली असून त्यात काचा फुटल्या. अकिया वेदीचे प्रदेशाध्यक्ष के.पी. शशीकला या अय्यप्पा मंदिराच्या यात्रेसाठी आल्या असता त्यांना मराकोटम येथे पहाटे अडीच वाजता ताब्यात घेण्यात आले. या महिलेने प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, मंदिर रात्री बंद असताना कुणालाही तेथे जाऊ दिले जाणार नाही. शुक्रवारी रात्री या महिलेस पोलिसांनी इरूमुडीकेटू या धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना ताब्यात घेतले. कारण ती महिला तेथे पोहोचेपर्यंत मंदिर बंद होणार होते. नंतर या महिलेस राणी पोलिस स्टेशनला नेण्यात आले. दुसऱ्या एका संघटनेचे नेते सुधीर यांनाही ताब्यात घेण्यात आले. अकियावेदी संघटनेचे निदर्शक राणी पोलिस स्टेशनसमोर जमले व नामजप सुरू केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी.एस श्रीधरन पिल्ले यांनी राज्य सरकार अय्यपा यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. शशिकला व सुधीर यांना का अटक करण्यात आली. आता या विरोधात भाजप निदर्शने करील व हरताळही सुरू राहिल असे त्यांनी कोझीकोड येथे सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एस.जे.आर कुमार यांनी असा आरोप केला की, शशिकला यांना अटक करण्यात आली आहे. इतरांनाही कोठडीत टाकण्यात आले आहे. दरम्यान मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवासम मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या २८ सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाळीच्या वयोगटातील सर्वच महिलांना मंदिर प्रवेशास परवानगी दिली होती.