कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींसाठी हिंदू एकता मंचने निधी गोळा करण्यास सुरुवात केली असून, लोकांना पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरोपींनी घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असून, त्याच पार्श्वभुमीवर हिंदू एकता मंचने हे आवाहन केलं आहे. आरोपींना कायदेशीर लढ्यासाठी आर्थिक मदत मिळावी हा त्यामागचा उद्धेश असल्याचं संघटनेने सांगितलं आहे.

हिंदू एकता मंचचे अध्यक्ष विजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या संघटनेच्या बैठकीत लोकांना मदतीसाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही”. पुढे बोलताना त्यांनी गरज पडल्यास निधी उभा करण्यासाठी आमच्या मित्र आणि शुभचिंतकांना संपर्क करु असं सांगितलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयात केस लढण्यासाठी सर्वोत्तम लीगल टीम असावी यासाठी आमचा प्रयत्न असून त्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करु. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी पुढे येऊन पैसे उभे करण्यासाठी मदत करावी जेणेकरुन ही मदत आरोपींच्या कायदेशीर लढ्यासाठी वापरता येईल”, असं विजय शर्मा यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणं गरजेचं आहे असं सांगत खऱ्या आरोपींचा शोध लागला पाहिजे असं म्हटलं आहे. “सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर याचिका दाखल करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट वकिलांची टीम तयार केली आहे. या प्रकरणातील खऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची गरज असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. मूळ आरोपींचा शोध घेऊन, विनाकारण अडकवण्यात आलेल्यांची सुटका झाली पाहिजे”, असं त्यांनी सांगितलं आहे.