17 February 2019

News Flash

देशातील हिंदूंची संख्या वाढली; मात्र लोकसंख्येतील टक्का घटला

गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची माहिती

प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील हिंदूंचे प्रमाण गेल्या ४ दशकांमध्ये दुपटीने वाढले आहे. मात्र देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास याच कालावधीत हिंदूंचे एकूण टक्केवारीतील प्रमाण घटले आहे. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे.

१९७१ मध्ये देशामधील हिंदूंचे प्रमाण ४५ कोटी ३३ लाख इतके होते. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील हिंदूंची संख्या ९६ कोटी ६२ लाखांवर पोहोचली आहे. ‘४० वर्षांमध्ये हिंदूंची संख्या वाढली आहे. मात्र एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण घटले आहे. १९७१ मध्ये देशातील हिंदूंचे प्रमाण ८२.७% इतके होते. २०११ मध्ये हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७९.८% इतके झाले आहे,’ असे हंसराज अहिर यांनी म्हटले आहे.

याआधी २०१५ मध्ये मोदी सरकारकडून देशातील धर्म आधारित लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यानुसार २००१ ते २०११ या १० वर्षांच्या कालावधीत मुस्लिम धर्मीयांच्या संख्येत ४ कोटींपेक्षा अधिकची वाढ नोंदवण्यात आली होती. २००१ मध्ये देशातील मुस्लिमांची संख्या १३.८ कोटी इतकी होती. २०११ मध्ये ही संख्या १७.२२ कोटींवर जाऊन पोहोचली. या काळात हिंदूंच्या लोकसंख्येतील वाढ ही मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीपेक्षा कमी होती.

जनगणना आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार २०११ च्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी इतकी आहे. यामध्ये हिंदूंचे प्रमाण ९६.६२ कोटी (७९.८%), मुस्लिमांचे प्रमाण १७.२२ कोटी (१४.२%), ख्रिश्चन २.७८ कोटी (२.७८%), शीख २.०८ कोटी (१.७%), बौद्ध ०.८४ कोटी (०.७%), जैन ०.४५ कोटी (०.४%) आणि अन्य धर्मीयांचे प्रमाण ०.७९ कोटी (०.७%) इतके आहे.

एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्स सेंटरने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या १.६ अब्ज इतकी होती. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या २३ टक्के इतके होते. सध्या मुस्लिम धर्मीयांची संख्या ख्रिश्चन धर्मीयांपेक्षा कमी आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केल्यास मुस्लिम धर्म जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे, असे प्यू रिचर्स सेंटरने अहवालात म्हटले होते.

सध्याच्या घडीला इंडोनेशिया या देशात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र ‘२०५० च्या अखेरपर्यंत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला असेल. २०५० वर्ष संपताना भारतात तब्बल ३० कोटी मुस्लिम असतील. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र येत्या ३४ वर्षांमध्ये भारत इंडोनेशियाला मागे टाकेल,’ असे प्यू रिसर्च सेंटरने म्हटले होते.

First Published on March 15, 2017 9:48 am

Web Title: hindu population in india increases in absolute terms but decreases in percentage says hansraj ahir in loksabha