बांगलादेशात एका हिंदू धर्मगुरूंना धारदार शस्त्राने वार करून ठार करण्यात आले असून, मुस्लीम बहुल देशात या वर्षी क्रूरपणे हत्या करण्यात आलेले ते दुसरे धर्मगुरू आहेत. आनंदा गोपाल गांगुली असे या धर्मगुरूंचे नाव असून, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी पश्चिम झिनाईगाह जिल्हय़ातील नोल्डांगा येथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने गळय़ावर वार केले. त्यांचे शिरच कापण्यात आले. संशयित दहशतवाद्यांनी हा खून केला असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली. दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली असावी असे पोलीस प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी सांगितले. त्यांचे कुणाशी वैमनस्य नव्हते, त्यामुळे हल्ला नेमका कुणी केला असावा हे सांगणे कठीण असले तरी आम्ही तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार दहशतवाद्यांवरच संशय आहे. गांगुली यांचे शरीराचे भाग मिळाले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा छिन्नविछिन्न केलेला देह काही शेतकऱ्यांना दिसला. प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी गांगुली यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गांगुली हे सदर उपजिल्हय़ात नोलदांगा मंदिरात धर्मगुरू होते व ते त्यांच्या वाहनावर मंदिराकडे जात असताना प्रथम हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. नंतर त्यांचा गळा चिरून त्यांना ठार मारले. अजून कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. बांगलादेशात अल्पसंख्याक, बुद्धिवंत, परदेशी नागरिक, ब्लॉगर्स यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. रविवारी एका ख्रिश्चन उद्योजकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.

तीन दहशतवादी चकमकीत ठार

दरम्यान, बांगलादेश पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या वेळी तीन संशयित ठार झाले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेचे ते सदस्य होते. पोलीस अधीक्षक बाबुल अख्तर यांच्या पत्नीची रविवारी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यात जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेचा हात होता. या संघटनेच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असता  चकमकीत ढाका येथे दोन दहशतवादी ठार झाले असून, वायव्येकडील राजशाही शहरात एक जण मारला गेला.