उजव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणावर भाष्य केल्यामुळे वादात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी मंगळवारी पुन्हा एकवार आपली भूमिका स्पष्ट केली. हिंदूंना दुखावायचा माझा कोणताही हेतू नव्हता. फक्त एखाद्या धर्माच्या नावावर हिंसा करण्याला माझा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी एका मासिकात हिंदू कट्टरतावादावर ताशेरे ओढले होते. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत. पण आता ते थेट हिंसेत सहभागी होतात, असे म्हणत लोकांचा सत्यमेव जयतेवरील विश्वास उडत चालला असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून बराच गदारोळ माजला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आपल्या वाढदिवशी कमल हसन काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल त्यांनी म्हटले की, कोणत्याही धर्माच्या नावाखाली होणारी हिंसा योग्य नाही. तसेच मी धार्मिक हिंसेविरुद्ध एखादे आवाहन नव्हे तर भीती व्यक्त केली होती. यामागे हिंदूंना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. तसेच मी कधीही ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचा उल्लेख केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कमल हसनसारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजे : हिंदू महासभेचा नेता बरळला

दरम्यान, हिंदू महासभेचे नेते अशोक शर्मा यांनी कमल हसन यांच्यावर विखारी टीका केली होती. स्वतःचा जातीय अजेंडा पुढे नेण्यासाठी काही लोक हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अशा लोकांना हाताळण्याची एकच पद्धत आहे. या लोकांना फासावर लटकवा किंवा त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे शर्मा यांनी म्हटले होते.

…मग दहशतवाद नेमका काय असतो?- प्रकाश राज