हिंदू धर्मावरील नितांत श्रद्धेमुळेच आपल्या हाती देशाच्या सत्तेची सूत्रे आली असल्याची समजूत देशातील काही हिंदू धर्मीयांनी करून घेतली आहे. सत्तेतील उच्चपदस्थही त्यांच्या या समजुतीला आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखवत नसल्याने हा समज आणखीनच दृढ होताना दिसत आहे. मात्र, त्यामुळे हिंदू धर्म स्वत:ची पारंपरिक सहन करण्याची क्षमता आणि सहिष्णू ओळख हरवत असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ वकील फली नरीमन यांनी केले. ते शुक्रवारी दिल्ली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या वार्षिक व्याख्यानमालेत बोलत होते. आपण केंद्रात बहुमताने सत्तेत आलेल्या सरकारचे स्वागत करतो. परंतु; बहुमताने सत्तेत आलेल्या सरकारी पक्षांच्या यापूर्वी आलेला अनुभवावरून, काहीशी भीतीदेखील वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. काही व्यक्ती किंवा समुहांकडून देशातील अल्पसंख्यांक समाजाविरुद्ध सातत्याने निंदात्मक कारवाया केल्या जातात. मात्र, बहुमताने सत्तेत आलेले सरकारी पक्ष असे प्रकार थांबविण्यासाठी काही करताना दिसत नसल्याचे परखड मत फली यांनी मांडले.