ब्रिटनमधील पहिल्या एक हजार श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधूंचा पहिला क्रमांक लागला असून यादीत भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी एन मित्तल व लॉर्ड स्वराज पॉल यांचा समावेश आहे.
  या यादीतील पहिल्या १००० जणांची मालमत्ता ब्रिटनच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या एक तृतीयांश असून ती ५१८.९ अब्ज पौंड आहे. श्रीचंद हिंदुजा (७८), गोपीचंद हिंदुजा ( ७४) यांचा हिंदुजा समूह बहुराष्ट्रीय असून त्यांचा तेल उत्पादन, स्थावर मालमत्ता, स्वयंचलित यंत्र उद्योगात सहभागी आहे. गेल्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत हिंदुजा बंधू तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांची संपत्ती आता ११.९ अब्ज पौंड आहे, असे संडे टाइम्सने आज प्रसिद्ध केलेल्या यादीत म्हटले आहे.
    लंडनच्या हिंदुजा समूहाने पोलाद उत्पादनातील प्रमुख उद्योगपती असलेले लक्ष्मी एन मित्तल यांना मागे टाकले,  पण मित्तल आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची संपत्ती १०.२५ अब्ज आहे. गेल्या वर्षी हिंदुजा बंधूंनी सौदी अरेबियन वंगण कंपनी पेट्रोमिन मध्ये असलेले ४९ टक्के समभाग २० कोटी पौंडांना विकले. कुटुंबाच्या इंडसइंड बँकेचे २.७ अब्ज डॉलरला भांडवलीकरण केले, ब्रिटनमध्ये हिंदुजा ऑटोमोटिव्हची उलाढाल २०१२-१३ मध्ये १.५ अब्ज पौंड झाली.
   यादीप्रमाणे पहिल्या एक हजार श्रीमंत स्त्रीपुरुषांची मालमत्ता जास्त असून ती देशाच्या देशांतर्गत उत्पन्नाच्या एक तृतीयांश आहे. या श्रीमंतांची मालमत्ता गेल्यावर्षीच्या तुलनेत १५.४ टक्क्य़ांनी वाढली आहे, त्यावेळी ती ४४९.६ अब्ज पौंड होती. या यादीत अनिवासी भारतीय उद्योगपती प्रकाश लोहिया, लॉर्ड स्वराज पॉल व अनिल आगरवाल व अजय काळसी यांचा पहिल्या शंभरात समावेश आहे.
   त्यानंतर ब्रिटनचे शीख हॉटेलव्यावसायिक जसमिंदर सिंग व कुटुंबीय १२१ व्या स्थानावर असून त्यांची मालमत्ता ८४ कोटी पौंड आहे. नवीन व वर्षां इंजिनीयर यांचा १२३ वा क्रमांक लागला असून  त्यांची मालमत्ता ८१ कोटी पौंड आहे तर औषध उद्योगातील जटानिया बंधू यांचा क्रमांक १७० वा लागला असून त्यांची मालमत्ता ६० कोटी पौंड आहे.
   ही यादी १९८९ पासून तयार करणारे फिलीप बेरेसफोर्ड यांनी सांगितले की, व्यक्तीगत मालमत्तेत इतकी मोठी वाढ आपण कधीही पाहिली नव्हती. या उद्योगपतींच्या यशाने रोजगार व संपत्ती निर्मिती झाली आहे. जगातील मानवतावादी दाते उसमानोव यांनी फेसबुकमधील ५२.५० कोटी पौंडाचे समभाग विकले.
   आर्सेलर मित्तल कंपनीचे समभाग पुन्हा  वाढले व आता त्यांची किंमत ६.६५ अब्ज पौंड झाली आहे. गेल्या वर्षी ही किंमत ७० कोटी पौंड होती, परंतु ती अजूनही २००८ च्या तुलनेत कमी आहे. लक्ष्मी मित्तल हे मालमत्तेच्या यादीत आठ वर्षे आघाडीवर होते.