१९७१ मधील बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैनिकांनी पूर्व पाकिस्तानात पद्धतशीरपणे हिंदूंची वंशहत्या केली होती व त्याकडे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी कानाडोळा केला, असे एका नवीन पुस्तकात म्हटले आहे. भारत सरकारनेही  देशांतर्गत हिंदू-मुस्लिम संघर्ष व जनसंघाचा रोष टाळण्यासाठी भूमिका घेताना केवळ बंगाली लोकांना हुसकावले जात आहे किंवा त्यांची हत्या होत आहे, अशी भूमिका घेतली पण भारत सरकारलाही त्यावेळी हिंदूंची वंशहत्या होते असल्याचे माहीत होते, असे या पुस्तकात लिहिले आहे.
भारत सरकारला हे माहीत होते की, निक्सन प्रशासन हे हिंदूंच्या हत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे तरीही त्यावेळी बांगलादेशातील बंगाली समुदायाची ती हत्या आहे ती वंशहत्या नाही असे सांगण्यात आले कारण ती हिंदूंची वंशहत्या आहे असे सांगितले असते तर जनसंघाने आरडाओरडा केला असता असे गॅरी जे बास यांच्या ‘द ब्लड टेलेग्राम-निक्सन किसिंजर अँड फॉरगॉटन जिनोसाइड’ या पुस्तकात म्हटले आहे.
हे हिंदूंचे शिरकारण ठरवण्याऐवजी केवळ बंगाली लोकांचे हत्याकांड आहे, असे त्यावेळच्या हिंसाचाराचे रूप अत्यंत किरकोळ करून टाकण्यात आले होते असे बास यांनी म्हटले आहे. बास हे प्रिन्स्टन विद्यापीठात राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयाचे प्राध्यापक आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यावेळी असा युक्तिवाद केला की, पाकिस्तानचे जनरल त्यांच्या देशातील निवडणुकीत हरले कारण तेथे अनेक लोक बंगाली होते व त्यांची हत्या करून पूर्व बंगालमध्ये त्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न होता. अन्यथा त्यांना पाकिस्तानात बहुमत मिळणे शक्य नव्हते, असे बास यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी सैन्याने हिंदूंचे पद्धतशीरपणे शिरकाण केले, त्यांना लक्ष्य केले तरीही कुठेच हिंदूंची वंशहत्या झाल्याचे सांगितले गेले नाही, कारण त्यामुळे हिंदू राष्ट्रवादी जनसंघाने आरडाओरड केली असती व त्यांना निमित्त मिळाले असते. भारताचे मॉस्कोतील राजदूत डी. पी. धर यांनी पाकिस्तानी लष्कराच्या हिंदूंची कत्तल करण्याच्या पूर्वनियोजित धोरणाचा निषेध केला होता पण  तो दृष्टिकोन बाजूला राहिला. अमेरिकेचे ढाक्यातील वाणिज्य दूत आर्चर ब्लड यांच्या मते पूर्व पाकिस्तानच्या लोकसंख्येत हिंदूची संख्या १ कोटी म्हणजे १३ टक्के होती. त्यामुळे त्यांना ठार करून किंवा हाकलून देण्यात काही तर्कसंगतता नव्हती. ते हिंदू नि:शस्त्र होते व पूर्व पाकिस्तानात विखुरलेले होते. पण त्यांच्यावर भारताशी संबंध असल्याचा शिक्का मारला गेला होता, पाकिस्तानच्या दृष्टीने ते बाहेरचे होते.
त्यावेळी पाकिस्तानचे लष्करी गव्हर्नर टिक्का खान यांनी तर, पूर्व पाकिस्तान हा भारताचा गुलाम बनला आहे असे त्यावेळी म्हटले होते.  एका लेफ्टनंट कर्नलची पूर्व पाकिस्तानचे मुख्य मार्शल लॉ प्रशासक ए. ए. के.नियाझी यांच्यापुढे साक्ष झाली होती. त्यावेळी मे मध्ये एका ब्रिगेडियरने हिंदूंना ठार करण्याचे आदेश दिले होते, असे स्पष्ट केले.
त्यावेळचे अमेरिकी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांनी अध्यक्ष निक्सन यांना एकदा सांगितले होते की, याह्य़ाखानने पूर्व पाकिस्तानातून हिंदूंना हाकलून आणखी एक चूक केली आहे,असे या पुस्तकात म्हटले आहे.