जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा हिंदू राजा होता तोपर्यंत इथले हिंदू सुरक्षित होते. शिख बांधवही सुरक्षित होते. मात्र हिंदू राजवटीचा ऱ्हास होऊ लागला आणि काश्मीरमध्ये हिंदूंचाही ऱ्हास झाला. आज काय स्थिती आहे ती आपण पाहतोच आहोत. काश्मीरमध्ये कोणीही सुरक्षित आहे असे म्हणता येईल का? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर या इतिहासावरून आपल्याला योग्य तो धडा घेतलाच पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. लखनऊ येथील विश्वेश्वरया ऑडिटोरियममध्ये झालेल्या एका कार्यक्रमा योगी आदित्यनाथ बोलत होते.

शिख बांधवांच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांची हजेरी होती. यावेळी त्यांनी गुरु तेज बहाद्दुर सिंग यांचेही उदाहरण दिले. तेज बहाद्दुर यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आणि काश्मीरचे रक्षण केले. त्यांनी देशासाठी आणि धर्मासाठी चार मुलांचाही त्याग केला होता असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांचीही उदाहरणं योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात दिली. दहशतवादी हल्ले कसे केले जात आहेत. इम्तियाज अहमद मीर या अधिकाऱ्याची हत्या कशी केली गेली हेदेखील त्यांनी सांगितले. तसेच हिंदू राजा होता तोपर्यंत काश्मीर हिंदू आणि शिख बांधवांसाठी सुरक्षित होते आता मात्र ते कोणासाठीच सुरक्षित राहिलेले नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.