राफेल करारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीला वगळण्याचा निर्णय आमच्या नाही तर आधीच्या म्हणजे काँग्रेसप्रणीत सरकारनेच घेतला होता, असा टोला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला आहे. काँग्रेसचे नेते व माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी भाजपावर हल्ला करताना सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सला करारातून का वगळले असा सवाल केला होता. सीतारामन यांनी अवघ्या काही तासांमध्येच त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“हिंदुस्थान एरोनॉटिक्स व दासाल्ट एव्हिएशन – जी कंपनी राफेलचं उत्पादन करते – यांच्यामध्ये उत्पादनासंदर्भात एकवाक्यता झाली नाही आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्सचं नाव बाद झालं. विशेष म्हणजे हे काँग्रेस सरकारने केलेल्या कराराच्यावेळीच झालेलं आहे,” सीतारामन म्हणाल्या.
“उत्पादन कशाप्रकारे घ्यावं याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये मतभिन्नता होती, त्यामुळे त्या एकत्र काम करू शकल्या नाहीत. आणि हे आधीच्या सरकारच्या काळातच झालं. यावरून हिंदुस्थान एरोनॉटिक्सचं नाव वगळण्याचं काम कुणाच्या काळात झालं हे स्पष्ट होत नाही का?” सीतारामन यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रश्न उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी घनिष्ठ संबंध असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचा फायदा करून देण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा पत्ता भाजपानं कापल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.  सीतारामन यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही कंपनी जेटचं उत्पादन करू शकत नाही असं सांगून या कंपनीची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही अँटनी यांनी केला होता.

यावेळी, नवज्योत सिंग सिद्धूनं इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात हजर राहणं व पाकिस्तानी लष्करप्रमुखाला मिठी मारणं यामुळे सैन्याच्या व भारतीयांच्या भावना दुखावल्याचे सीतारामन म्हणाल्या आहेत. सिद्धूनं ते टाळायला हवं होतं असं सीतारामन म्हणाल्या.