हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘अमर उजाला’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढेच नाही तर कोणताही एक नेता किंवा एक पक्ष हा देशाला महान बनवू शकत नाही तर त्यासाठी समाजाचेही मोठे योगदान असावे लागते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

पूर्वी काहीही समस्या भेडसावू लागली की लोक देवाकडे साकडे घालत किंवा देवाला दोष देत. सध्या कलियुग आहे त्यावेळी लोक सरकारला दोष देतात. मात्र सरकार समस्या निवारण्याचे काम तेव्हा करते जेव्हा समाजही त्यांना साथ देतो. जेव्हा समाज बदलतो तेव्हा सरकारवरही त्याचा परिणाम बघायला मिळतो. सरकारी यंत्रणांमध्येही बदल बघायला मिळतात. भारतामध्ये जगातील महासत्ता होण्याची क्षमता आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.