बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अश्लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यापासून देशभरात #MeToo मोहिम चांगलीच चर्चेत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वच क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात वाचा फोडायला सुरूवात केली आहे. अनेक महिला पत्रकारांनीही वरीष्ठ पत्रकारांवर आरोप केले आहेत. याच मोहिमेअंतर्गत हिंदुस्तान टाइम्सचे ब्यूरो चीफ आणि पॉलिटिकल एडिटर प्रशांत झा यांच्यावरही एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या आरोपानंतर प्रशांत झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

संपादकांना लिहिलेल्या पत्रामध्ये झा यांनी, ‘माझ्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. माझ्या वैयक्तिक आचरणावर नैतिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे कंपनी अडचणीत येऊ नये, त्यासाठी मी राजीनामा देणंच योग्य आहे’ असं म्हटलं आहे. प्रशांत झा यांच्यासह शुक्रवारपासून अनेक पत्रकारांवर महिला पत्रकारांनी आरोप केले आहेत. बंगळुरूच्या ‘मिरर नाऊ’ या वृत्तपत्राच्या माजी पत्रकार संध्या मेनन यांनी टाइम्स ऑफ इंडियाचे रेजिडेंट एडिटर के.आर श्रीनिवास यांच्यावर 2008 साली लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ‘एचआर’कडे देखील तक्रार केली होती, पण काहीही कारवाई न झाल्याने अखेरीस नोकरी सोडल्याचं संध्या यांनी म्हटलं आहे.