पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-४०’ या विमानाने शुक्रवारी बेंगळुरूमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे शुभारंभीय उड्डाण केले. वैमानिकांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी या विमानाचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय हवाई दल ७० ‘हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-४०’ विमानांची खरेदी करणार आहे.
दोन जणांची बसण्याची क्षमता असलेल्या या विमानाची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने केली आहे. कंपनीच्या हवाईतळावर शुक्रवारी या विमानाने सुमारे १५ ते २० मिनिटे हवाई सफर केली. कॅप्टन सी. सुब्रमण्यम आणि वेणुगोपाल यांनी या शुभारंभीय उड्डाणाचे सारथ्य केले. तिन्ही संरक्षण दलांच्या स्नातकांच्या प्रशिक्षणावेळी त्यांना हे विमान चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.