हिंदुत्ववाद हा केवळ धर्म नाही तर ती जीवनपद्धती आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या समवेत मोदींनी गुरुद्वारा व लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली.
टोरांटोहून आगमन झाल्यानंतर थेट पंतप्रधान गुरुद्वारात गेले. यावेळी त्यांना सरोपा भेट देण्यात आला. कॅनडातील शीख समुदाय त्यांच्या कामाच्या आधारे भारतीयांमध्ये आदरास पात्र ठरल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वातंत्र्य चळवळीतील शीख समुदायाच्या योगदानाबाबतही त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांनी भगतसिंह यांचा उल्लेख केला. मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत लक्ष्मी नारायण मंदिरालाही भेट दिली.
 हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्माची उत्तम व्याख्या केल्याचे मोदींनी सांगितले.
 हा केवळ धर्म नसून जीवनपद्धती आहे हे मत मार्गदर्शक ठरते. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून हिंदू धर्माने निसर्गाच्या उद्धारासाठी काम करून छोटय़ा समस्यांसाठी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे मोदींनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर करण्याचा उल्लेखही मोदींनी केला.
जगभरातील भारतीय समुदायाने योगासनाच्या फायद्याबाबत जागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. भारत-कॅनडा संबंधामध्ये भारतीय समुदायाने बजावलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले. दरम्यान तीन देशांचा दौरा अटोपून मोदी मायदेशी रवाना झाले.