पंतप्रधान मनमोहनसिंह यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे सरकार चालवण्यात अडचणी येत होत्या असा आरोप पंतप्रधानांचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांनी केला आहे. संजय बारू यांनी लिहिलेल्या ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ़ मनमोहन सिंह’ या पुस्तकातून पंतप्रधान कशाप्रकारे काँग्रेस श्रेष्ठींना शरण गेले होते, या सगळ्याचा परिणाम मनमोहन सरकारच्या निर्णयक्षमतेवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयातील आपल्या काही सहका-यांशी बोलताना मनमोहनसिंह यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला असल्याची भावना व्यक्त केली होती. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, संजय. बारू यांनी मागील आठवड्यातच आपल्या या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना पाठविली होती. तसेच पुस्तकाच्या प्रतीबरोबर पाठविलेल्या संदेशात 2009सालातील काही घटनांमुळे आपल्यालासुद्धा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. मनमोहनसिंह यांनी सरकार चालवताना घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये सोनिया गांधींकडून कशाप्रकारे हस्तक्षेप केला जात होता या सगळ्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अणुकरारासारखे काही मुदद्दे वगळता अन्य गोष्टींबाबत निर्णय घेताना मनमोहनसिंहाना निर्णय स्वातंत्र्य दिले जात नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर ते अक्षरक्ष: नतमस्तक झाले होते. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांचे श्रेय राहुल गांधी यांना दिले जात असल्याचेसुद्धा या पुस्तकात संजय बारू यांनी म्हटले आहे.