३० वर्षांपूर्वी निर्माण झालेली राजकीय अवस्था या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निर्माण झाली असून नशिबाचे चक्र या वेळी भाजपच्या बाजूने फिरले आहे. १९८४ मध्ये केवळ दोन जागा पटकावणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभेत निर्णायक बहुमत प्राप्त झाले आहे. तर ३० वर्षांपूर्वी ४१५ चा विक्रमी आकडा गाठणाऱ्या सत्ताधारी काँग्रेसला मात्र या वेळी ५० च्या पुढेही मजल मारता आलेली नसल्याचे दिसून येते.
गेल्या २५ वर्षांत देशात एकाच राजकीय पक्षाचे सरकार स्थापन झालेले नव्हते. प्रत्येक वेळी आघाडी, युती वा अल्पमतातील सरकार आले होते. मात्र गेली दहा वर्षे विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपला नरेंद्र मोदींच्या लाटेने पुन्हा सत्तेत आणलेच नाही तर एकहाती सत्ता मिळवून देत १९८४ च्या निकालाची जणू पुनरावृत्तीच केल्याचे दिसून येते. १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी केवळ दोनच जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळी सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत.
तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर  निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला मोठा फायदा झाला होता.
मात्र त्याच्याउलट परिस्थिती या वेळी झाली आहे. १९७७ मधील आणीबाणीच्या काळात प्रथमच जनता पक्षाची एकहाती सत्ता होती. त्यानंतर केवळ दुसऱ्यांदाच भारतात भाजपच्या रूपाने या वेळी एकाच पक्षाला बहुमत मिळाले आहे.
वाजपेयींचा चेहरा
जनता पक्षाशी फारकत घेतल्यानंतर १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत चौथ्यांदा भाजप सत्तेत आली आहे. १९९६ साली भाजपने पहिल्यांदा सत्तास्थापनेचा अनुभव घेतला. मात्र दुर्दैवाने १३ दिवसच हे सरकार टिकले. त्यानंतर काँग्रेस सत्तेत आली. त्यानंतर १९९८ मध्ये एनडीएच्या माध्यमातून भाजपचे सरकार १३ महिने चालले. मात्र १९९९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारपुढे कारगिल युद्धाचे आव्हान उभे टाकले होते. या युद्धानंतर पाकिस्तानवर विजय मिळवून देणारे नेते म्हणून  अटलबिहारी वाजपेयींना भाजपने समोर आणले होते.