पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील रेल्वे, बस सेवा बंद करण्याची मागणी होत असतानाच आज पाकिस्तानातून समझोता एक्सप्रेस दिल्लीत दाखल झाली. या ट्रेनच्या नियमित प्रवाशांसाठी पाकिस्तान सासर तर भारत माहेर अशी भावना आहे. थार एक्सप्रेस सुरु होण्यआधी समझोता एक्सप्रेसच भारत-पाकिस्तानला जोडणारे एकमेव रेल्वे कनेक्शन होते.

छायाचित्र – अमित मेहरा

समझोता एक्सप्रेस चालू होऊन आज ४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. २२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली.

छायाचित्र – अमित मेहरा

जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेऱ्या व्हायच्या. १९९४ पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेऱ्या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर २००२ ते २००४ अशी दोन वर्ष समझोता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती.

समझोता एक्सप्रेसला अनेकदा राजकारणासाठीही लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे अनेकदा ही ट्रेन बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २००७ रोजी पानिपतमधील दिवाना स्टेशनजवळ समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी नागरीकांची संख्या जास्त होती. स्वामी असीमानंद यांच्यावर या स्फोटासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.