तामिळनाडूमध्ये सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याने भाजपाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपावर विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत टीकाही होत आहे. असं असतानाच आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे. चेन्नईतील कुख्यात गुंड भाजपाच्या सदस्य जोडणी अभियानाअंतर्गत पक्षाचे सदस्यत्व घेऊन पक्षप्रवेश करणार होता. मात्र अचानक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांना पाहताच सूर्याने तेथून पळ काढला. अनेक प्रकरणांमध्ये सूर्या वॉण्टेड गुन्हेगारांच्या यादीमध्ये आहे. पोलीस मागील बऱ्याच काळापासून त्याचा मागावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्या हा रेड हिल्स नावाने ओळखला जातो. हत्येच्या सहा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सूर्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबरच हत्येचा प्रयत्न, विस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न याबरबरोबर इतर गंभीर गुन्ह्यांखाली त्याच्याविरोधात जवळजवळ ५० खटल्यांची नोंद आहे. भाजपाने सूर्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी चेन्नईतील वेंडालुरुमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल मुरगनही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले होते. त्याचवेळी कोणीतरी पोलिसांनी सूर्या या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती दिली आणि चेंगलपट्टू जिल्ह्याचे पोलीस सूर्याला अटक करण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची तुकडी बघून सूर्याने तेथून पळ काढला. पोलिसांना सूर्याला पकडण्यात अपयश आलं असलं तरी त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या सहा जणांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपाचे काही नेता आणि कार्यकर्ते पोलीस स्थानकाच्या बाहेर पोहचले आणि गोंधळ घालू लागले. तिथेच भाजपा कार्यकर्ते आंदोलन करु लागले आणि अटक करण्यात आलेल्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात पक्षाचे महासचिव के. टी. राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ज्या सहा जणांना अटक केली त्यापैकी दोन पक्षाच्या सदस्यांना सोडून देण्यात यावे अशी आमची मागणी होती. सर्व गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी अखेर या अटक करण्यात आलेल्या सहा जणांना सोडून दिल्याचे न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.