सनातन धर्माच्या अनुयायांनी साईबाबांची पूजा करू नये, असा ठराव छत्तीसगडमधीलधर्मसंसदेत संमत करण्यात आल्यानंतर बलसाडमधील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हलविण्यात आली आहे. सदर मूर्ती सध्या मंदिराच्या तळघरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
साईबाबांना देव मानू नये, असे आवाहन द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाची दखल घेऊन धर्मसंसदेत या आशयाचा ठराव करण्यात आला.
या शहरातील साईबाबांच्या भक्तगणांशी सल्लामसलत करून साईबाबांची मूर्ती तळघरात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मूर्तीची पुनप्र्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य स्थळ मिळाल्यानंतर सदर मूर्ती पुन्हा भक्तगणांकडे सुपूर्द केली जाईल, असे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता भिदभंजन महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी साईबाबांची मूर्ती मंदिरातून हलवून ती तळघरात सुरक्षित ठेवली आहे. मंदिराचा कारभार आखाडय़ामार्फत चालविला जातो. त्यामुळे आम्हाला नियमांचे पालन करावेच लागेल, आम्हाला केवळ हनुमान आणि श्रीराम यांच्याच मूर्ती ठेवता येणार आहेत, असे विश्वस्तांनी सांगितले.