एका महिलेला तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागत आहे. पतीमुळे तिला एचआयव्हीची लागण झाली आणि तिच्या आयुष्यातील नरकयातना सुरू झाल्या. एड्समुळे आधी पतीचा मृत्यू झाला, जन्म घेताच मुलाचाही मृत्यू झाला. अशा खडतर परिस्थितीत सासरच्यांनीही तिचा छळ करायला आपण कुठेही कमी पडणार याची पुरेपुर काळजी घेतली. त्यानंतर तिला घराबाहेर हाकलून देण्यात आलं. अखेर 31 ऑक्टोबर रोजी त्या पीडितेने आपल्या सासरच्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार केली. चंदीगडच्या सेक्टर 32 मधील एका रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. हरयाणाच्या यमुनानगरमधील फर्कपूर या गावातील ही घटना आहे.

पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. पतीला एचआयव्हीची लागण आहे, हे त्यावेळी तिच्यापासून लपवण्यात आलं होतं. पतीला कोणताच त्रास नाही असं तिला सांगण्यात आलं होतं. पण लग्नाच्या दीड वर्षानंतरच एचआयव्हीमुळे पतीचा मृत्यू झाला. गर्भवती असल्यामुळे पीडित महिलेची रुग्णालयात तपासणी केली असता तिला देखील एचआयव्हीची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आणि तिला जबर धक्का बसला. त्यानंतर मुलाचा जन्म होताच मृत्यू झाला. पती आणि मुलाच्या मृत्यूचं दुःख कमी की काय म्हणून सासरच्यांनीही तिच्यावर छळ करण्यास सुरूवात केली. ‘मलाही एचआयव्हीची लागण झाल्याचं सासरच्यांना कळाल्यानंतर त्यांचं माझ्याशी वागणं बदललं आणि त्यांनी माझा छळ करायला सुरूवात केली’. तिने घरातल्या कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली होती, त्यानंतर तिला थेट घरातूनच बाहेर काढण्यात आलं. अखेर 31 ऑक्टोबरला त्या पीडितेने सासरच्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार केली.

‘काहीतरी काम करुन मी माझा उदरनिर्वाह भागवेल, मला दुसरं कोणावर अवलंबून राहायचं नाहीये. पण मला माझ्या सासरी राहायचं आहे’, असं ही पीडिता म्हणाली. तर याबाबतची तक्रार आल्यानंतर लगेचच तातडीने कारवाई केली जाईन अशी माहिती महिला आयोगाच्या सदस्या नम्रता गौड यांनी दिली आहे.