हिजबूल-ए-मुजाहिद्दीनचे दहशतवादी दिल्लीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती समोर आली आहे. मात्र अटक झाल्यामुळे त्यांचा हा कट फसला. निलंबित जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग या दहशतवाद्यांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी मदत करत होते. उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची चौकशी केली असता त्यांना राजधानी दिल्ली, पंजाब आणि चंदिगडमध्ये स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी दिली होती असं उघड झालं आहे. स्फोट घडवण्यासाठी अजून काही दहशतवादी त्यांना सोबत देण्यासाठी येणार होते असंही सुत्रांकडून समजलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांचं प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवलं आहे. एनआयएची सहा सदस्यीय टीम याप्रकरणी तपास करत असून त्यासाठी ते काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. देविंदर सिंग यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेलं जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी देविंदर सिंग यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. तपास यंत्रणेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देविंदर सिंग यांच्या घरात सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरुन दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते असं दिसत आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीमधील गजबजलेल्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता होती.

प्राथमिक तपासात देविंदर सिंह आणि दहशतवादी यांच्यात फार आधीपासूनच संपर्क होता. अद्याप यामागचा हेतू काय होता हे समोर आलं नसलं तरी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात होते असं सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देविंदर सिंह यांना दहशतवाद्यांनी दिल्लीत पोहोचवण्यासाठी १२ लाख रुपये देण्यात आले होते.

श्रीनगरमध्ये देविंदर सिंग यांच्या घराचं बांधकाम सुरु असून यासाठी दहशतवाद्यांकडून मिळालेल्या पैशांचा वापर केला जात होता असा संशय आहे. तपासात समोर आलं आहे त्यानुसार, अटक करण्यात आलेला हिजबूलचा कमांडर नवीद बाबू आणि त्याचे दोन साथीदार रफी आणि मीर इरफान यांना देविंदर सिंग यांनी त्यांचं निवासस्थान शोपियन येथून सोबत आणलं होतं. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी देविंदर सिंग यांच्या निवासस्थानी रात्र घालवली होती. विशेष बाब म्हणजे देविंदर सिंग बऱ्याच कालावधीपासून देशविरोधी कारवायांमध्ये सक्रीय होते, मात्र जम्मू काश्मीर पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागला नाही.