जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढत असतानाच राज्यात सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांमध्येही वर्चस्वाची लढाई सुरु असल्याचे समजते. ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहउद्दीनने प्रमुखपदावरुन पायउतार व्हावे यासाठी लष्कर- ए- तोयबा व जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी दबाव टाकला आहे. ‘दहशतवादी संघटनांमध्ये आपआपसांत लढाई होणे ही भारतासाठी सकारात्मक गोष्ट असली तरी ‘लष्कर’ व ‘जैश’चा जम्मूतील प्रभाव वाढणे ही भारतासाठी धोक्याची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जम्मू- काश्मीरमध्ये ‘जैश’ आणि ‘लष्कर’च्या कारवाया वाढल्या आहेत. या दोन्ही दहशतवादी संघटनांना काश्मीरमध्ये प्रभाव निर्माण करायचा आहे. जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील प्रशिक्षित दहशतवाद्यांना हल्ल्यांमध्ये मदत करावी, असे या संघटनांच्या म्होरक्यांना वाटते. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार ‘जैश’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा हाफिज सईद या दोघांनी पाकच्या गुप्तचर यंत्रणेवर ‘हिज्बुल’च्या म्होरक्याच्या हकालपट्टीसाठी दबाव टाकला आहे. या दहशतवादी संघटनांनी ‘हिज्बुल’च्या दहशतवाद्यांना म्होरक्या सय्यद सलाहउद्दीनविरोधात भडकवायला सुरुवात केली आहे.

गेल्या दोन वर्षात भारतीय सैन्याने हिज्बुल विरोधात मोहीम राबवली. हिज्बुलचे अनेक कमांडर व दहशतवादी चकमकीत मारले गेले. या संघटनेचे कंबरडे मोडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यामुळे जैश व लष्कर आता हिज्बुलवर नाराज आहेत. ‘जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैन्याच्या तळांवरील हल्ल्यांमागे जैश व लष्करचा हात असल्याचे समोर आले. यावरुन या दोन्ही संघटनांना राज्यात हातपाय पसरवायचे आहेत हे स्पष्ट होते. यात हिज्बुलची आडकाठी येत असल्याने सलाहउद्दीनवरील दबाव वाढला आहे’ असे गृहखात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या संघटनेच्या दहशतवाद्यांना लष्कर व जैशमध्ये सामील करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

दहशतवादी संघटनांमध्ये वाद होणे ही सुरक्षा दलांसाठी काही अंशी सकारात्मक बाब आहे. मात्र लष्कर आणि जैशने काश्मीरमध्ये सक्रीय होणे ही चिंतेची बाब देखील ठरत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.