ग्राम पंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या कामात गुंतून राहिल्यामुळे कार्यकर्त्यांना सामाजिक कामे करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे या सर्वच निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याऐवजी एकाचवेळी घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात मांडला आहे. सातत्याने कोणत्यातरी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पक्षांचा आणि कार्यकर्त्यांचा वेळ अनावश्यक वाया जातो आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधल्याचे सूत्रांकडून समजते.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यावेळी मोदी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर हा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठकीतही हा मुद्दा आपण मांडला असल्याचेही मोदी यांनी सांगितले. सगळ्याच पक्षांनी या प्रस्तावा पाठिंबा दिला असल्याचेही मोदी म्हणाले. भाजपही या प्रस्तावाच्या बाजूनेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत वेगवेगळ्या निवडणुकीच्या कामातच गुंतून राहण्यापेक्षा लोकोपयोगी कार्यक्रम आणि सरकारची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजेत. त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामे केली पाहिजेत. सध्याच्या रचनेमध्ये या कामांसाठी फार कमी वेळ मिळतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.
निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहिता लागू होते. त्यामुळे विकासकामांना खीळ बसते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांही प्रलंबित राहतात, हे टाळण्यासाठी सर्वच स्तरातील निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव योग्य असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.