विरोध पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अपप्रचार करीत असून त्यामुळे देशात अनागोंदी निर्माण झाली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच कम्युनिस्टांनी या कायद्यात मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेणार असल्याची एकतरी तरतूद दाखवून द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले.

ते म्हणाले,की विरोधकांकडे आता कुठलाच दुसरा मुद्दा उरलेला नाही त्यामुळे ते नागरिकत्व कायद्यावर चुकीची माहिती पसरवून अपप्रचार करीत आहेत. त्यामुळे देशात अराजक माजले आहे.

एनआरसी म्हणजे नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा यावरून देशात हिंसक निदर्शने सुरू असताना शहा यांनी वरील मत व्यक्त केले.

शहा हे गुजरात पोलिसांसाठी विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्या अल्पसंख्याक लोकांचा परदेशात छळ झाला ते स्वरक्षणासाठी भारतात आले, पण त्यांना मागील सरकारांनी कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत. कारण या स्थलांतरितांना सुविधा दिल्या तर इतर लोक नाराज होतील अशी भीती त्यांना वाटत होती. असे सांगून ते म्हणाले, की राहुल बाबा, ममता, केजरीवाल, कम्युनिस्ट हे सगळे जण नागरिकत्व कायद्याबाबत खोटे बोलत आहेत. त्यांनी या कायद्यात मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्याची हाकाटी पिटली आहे.

काश्मीरमध्ये हिंसाचाराला आळा

अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार झालेला नाही, एकही व्यक्ती मारली गेलेली नाही. काही विरोधी नेते अनुच्छेद ३७० रद्द केल्यास रक्तपात होईल असे पूर्वी संसदेत म्हणत होते पण लोकांनी या नेत्यांना ठोस उत्तर दिले आहे. हा अनुच्छेद रद्द केल्यानंतर कुठलाही हिंसाचार झाला नसून एकही व्यक्ती मरण पावलेली नाही, असेही शहा यांनी सांगितले.

आइषी घोष हिला विजयन यांचा पाठिंबा

तिरुअनंतपूरम : केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शनिवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या आइषी घोष यांची भेट घेतली. जेएनयूमधील शुल्कवाढ आणि सुधारित नागरिकत्व कायदा या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचे विजयन म्हणाले. नवी दिल्लीतील केरळ हाऊस येथे विजयन यांनी घोष यांची भेट घेतली. सुधन्वा देशपांडे लिखित ‘हल्ला बोल : द डेथ अ‍ॅण्ड लाइफ ऑफ सरदार हाश्मी’ हे पुस्तकही विजयन यांनी घोष यांना भेट दिले.