संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ चा सामना करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी निगडीत संस्थांच्या अधिका-यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना निर्देश दिले आहेत की, संभाव्य चक्रीवादळापासून नागरिकांना कोणतेही नुकसान होणार नाही, याची पुर्णपणे काळजी घेतील जावी. याशिवाय सर्व गरजेच्या सेवा जसे की वीज, टेलिफोन, आरोग्य व पिण्याचे पाणी यांची उणीव भासणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जावी, शिवाय नुकसानग्रस्त भागात या सेवा खंडीत होताच त्या तत्काळ पुर्ववत केल्या जाव्यात, २४ तास अधिकारी नियंत्रण कक्षाद्वारे या चक्रीवादळावर बारकाईने लक्ष ठेवतील. तिन्ही सैन्य दलांचे हॅलिकॅाप्टर तयारीतच राहतील.

या बैठकीनंतर कॅबिनेट सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिताची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आपत्तीस तोंड देण्यासाठी राज्य व केंद्रीय संस्थाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला जाईल. या बैठकीत गुजरातचे मुख्य सचिव आणि दीवच्या प्रशासकाचे सल्लागार उपस्थित राहणार आहेत.
गृहमंत्रालय राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय संस्थांशी सतत संपर्कात आहे. एनडीआरएफने २६ पथक आधीच तैनात केली आहेत, ज्यात बोट्स, ट्री कटर, टेलीकॉम उपकरणे इत्यादी सज्ज आहेत आणि गुजरात सरकारकडून आणखी १० पथक मागवण्यात आली आहेत.

हे चक्रीवादळ पुढील १२ तासांमध्ये गोवा व मुंबईच्या किनारपट्टीस धडकण्याची दाट शक्यता वर्तवल्या गेली आहे. तर ते गुजरातच्या दिशेने जात असल्याचेही माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचे नाव भारतानेच ठेवले आहे. १२ ते १३ जून दरम्यान सौराष्ट्र किनारपट्टीवर हे वादळ धडकू शकते. भारतीय हवामान विभागानुसार आता त्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर प्रती तास आहे. मात्र सौराष्ट्रापर्यंत पोहचेल तेव्हा त्याचा वेग ११० ते १३५ किलोमीटर प्रतीतास एवढा वेगाचा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पाकिस्तानच्या हवामान खात्याचे अब्दुर राशिद यांनी याबाबत सांगितले आहे की, या वादळाचा पाकिस्तानला फारसा फटका बसणार नाही, मात्र पाकिस्तानच्या किनारी भागात यामुळे वातावरणात उष्णता वाढू शकते.