अरुण जेटली यांच्या निधनाचं वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा हैदराबाद दौरा रद्द केला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच एम्स रुग्णालयाने माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. एम्स रुग्णालयात ९ ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अर्थमंत्री म्हणून काम केलं. भाजपाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. नोटाबंदीचा निर्णय असेल किंवा जीएसटीचा विषय असेल त्यासंदर्भातले महत्त्वाचे निर्णय अरुण जेटली यांनी घेतले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला निवडणूक लढवायची नाही आणि कोणतंही पद मला देऊ नका हे त्यांनी स्वतः सांगितले होते. त्यांना श्वसनाचा त्रास गेल्या काही दिवसांपासून होत होता. त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा हैदराबाद दौरा रद्द केला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

एक विद्वान आणि नम्र व्यक्तीमत्त्व ही त्यांची ओळख होती. एखादा मुद्दा पटवूून देण्यासाठी ते मेहनत घेत. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. सुषमा स्वराज यांचं निधन काही दिवसांपूर्वीच झालं. त्यापाठोपाठ आता अरुण जेटली यांचंही निधन झालं आहे. भाजपाची ही मोठी हानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.