केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद झाला होता. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमित शाह सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत.

पोलीस अधिकारी अर्शद अहमद खान अनंतनाग येथे १२ जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. अमित शाह यांनी अर्शद खान यांच्या पाच वर्षीय मुलगा उबान खान आणि इतर कुटुंबीयांची श्रीनगरमध्ये भेट घेतली. काही दिवसांपुर्वी अर्शद खान यांना श्रद्धांजली वाहतानाचा एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत पोलीस अधिकाऱ्याने अर्शद खान यांच्या मुलाला हातात उचलून घेतलं होतं. यावेळी भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

‘देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी बलिदान दिल्याने अनेक जीव वाचले आहेत. अर्शद खान यांच्या शौर्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे’, असं अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. यावेळी त्यांनी भेटीचा फोटोही शेअर केला आहे.

सीआऱपीएफ ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३७ वर्षीय अर्शद खान जखमी झाले होते. मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान ते शहीद झाले. या हल्ल्यात अजून पाच जवान शहीद झाले होते.