आसाममध्ये सध्या ईव्हीएमवरुन वाद निर्माण झाला आहे. मतदानानंतर शेजारच्या मतदरासंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या वाहनातून निवडणूक अधिकारी ईव्हीएम घेऊन जात होते. यानंतर वाद निर्माण झाला असून रातबारी मतदारसंघातील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी चार अधिकारी निलंबितदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्या पत्नीच्या गाडीमध्ये हे ईव्हीएम सापडले होते. विरोधकांनी यावरुन जोरदार हल्ला करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. खासगी वाहनातून ईव्हीएम का नेले जात होते असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीदेखील यावरुन जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.

अमित शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जर भाजपा नेत्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर निवडणूक आय़ोगाने कडक कारवाई करावी असं म्हटलं आहे. “माझ्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती नाही. मी दक्षिण भारतात प्रचार करत होतो. यासंबंधी अधिक माहिती मी घेईन…आम्ही निवडणूक आयोगाला कोणतंही पाऊल उचलण्यापासून कधी रोखलेलं नाही. जर तुम्ही म्हणत असाल तसं झालं असेल तर कायद्याप्रमाणे निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे. यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

याआधी कृष्णेंदू पॉल यांनी इंडिया टुडेशी बोलताना ईव्हीएम चोरीचा आरोप फेटाळला होता. गाडीमध्ये माझा चालक होता, आणि मदत मागितल्याने तो निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत होता असा दावा त्यांनी केला आहे.

“गाडीमध्ये माझा चालक होता. निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे मदत मागितली आणि त्याने ती केली. माझ्या कारवर पास चिकटवण्यात आला आहे ज्यामध्ये मी भाजपा उमेदवार असल्याचा उल्लेख आहे. निवडणूक अधिकारी यांना याची कल्पना होती की नाही हे माहिती नाही. आम्ही फक्त मदत केली,” असं कृष्णेंदू पॉल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसंच मतदान केंद्रावर फेरमतदानाचा आदेश देण्यात आला आहे.