“स्थलांतरीत मजुर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरंच काम केलं आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही,” असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. विकसित राज्यांच्या विकासामध्ये बिहारच्या बांधवांचाही हात असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे त्यांनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

“मोदी सरकारनं प्रवासी मजुरांसाठी श्रमिक एक्स्प्रेस सुरू करण्याचं काम केलं. याव्यतिरिक्त बिहारमध्ये बिहार सरकारनंही त्यांच्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांना केवळ ११०० रूपये देण्यात आले नाहीत, तर त्यांच्यासाठी आता रोजगाराचीही सोय केली जात आहे,” असं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुतीही केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात हे विरोधकांना माहित नाही. आयुष्यमान भारत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तब्बल एक कोटी लोकांनी पंतप्रधानांमुळे कोणत्याही खर्चाशिवाय शस्त्रक्रिया करून घेतल्या. याव्यतिरिक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी महिलांना एलपीजी गॅसची जोडणी मिळाली आणि त्यांना धुरापासून मुक्ती मिळाली,” असंही ते म्हणाले.

रॅलीला निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न

“विरोधक या रॅलीला निवडणुकीशी जोडत आहेत. परंतु याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. करोनाचा सामना करता लोकांशी संवाद साधणं अशक्य होत आहे. त्यामुळे अशा माध्यमातून लोकांशी संपर्क साधला जात आहे. विरोधक दिल्लीत बसून मौजमजा करण्याऐवजी अशा प्रकारे लोकांशी का संवाद साधत नाहीत? त्यांना कोणी अडवलं आहे?,” असा सवाल त्यांनी यावेळी केला.

लाल बहादुर शास्त्रींनंतर मोदींसारखा नेता पाहिला नाही

“भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यानंतर मोदींसारखा नेता मी पाहिला नाही. मोदींच्या एका शब्दावर लोक एकत्र आले. करोनादरम्यान त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यावेळीही त्यांच्या एका शब्दावर सर्वजण एकत्र आले आणि त्याचं काटेकोरपणे पालम केलं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जगात आपल्याला सन्मान

“एक असा काळ होता जेव्हा आपल्या हद्दीत कोणीही घुसू शकत होतं. हद्दीबरोबर छेडछाड करीत होतं. जवानांचे शीर कापले जात होते तेव्हा दिल्लीत कुठलीही संवेदना उमटत नव्हती. मात्र, आमच्या काळात उरी, पुलवामा हल्ले झाले. या काळात मोदींचं सरकार होतं. काही दिवसांतच आम्ही सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकच्या माध्यमातून शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मारलं. त्यामुळे जगानंही मान्य केलं की, अमेरिका आणि इस्रायलनंतर जर कोणत्या देशात आपल्या सीमांचं रक्षण करण्याची क्षमता असेल तरी भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सीमा सुरक्षित केल्या, अशी अनेक कामं केली ज्यामुळे जगात आपल्याला सन्मान मिळाला.”