देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकसभेच्या 17 निवडणुका पार पडल्या, 22 सरकार स्थापन झाली आणि 15 पंतप्रधान पाहिले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छाशक्ती हे त्यांना अन्य पंतप्रधानांपासून वेगळ करते. अशा प्रकारे गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती केली आहे. तसेच अन्य सरकारांनीही देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान दिल्याचे शाह म्हणाले.

काँग्रेसने 55 वर्षे देशावर राज्य केलं. त्यांना पूर्ण बहुमताबरोबरच 8 वेळा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अशी कोणतीही पावले उचलली नाहीत ज्यांना परिवर्तनाच्या रूपात आपण पाहू शकू. अटल बिहारी बाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुमत नसल्याचे ते करण शक्य झालं नसल्याचं शाह म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी यावर भाष्य केलं. गेल्या 63 महिन्यांमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य लोकांच्या जिवनात सकारात्मक बदल झाले आहेत. तसेच यामुळे देशाला पुढे नेण्यास मदत मिळाली असल्याचे ते म्हणाले.

नोटबंदी, जीएसटी, तिहेरी तलाक प्रथा बंद करणं, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक करणं, वन रँक वन पेन्शन, डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पद तयार करणं, यूएपीए सुधारणा विधेयक, ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा यासारखी अशक्य कामं त्यांनी शक्य करून दाखवली आहेत. याच सर्व गोष्टींमुळे ते दृढ इच्छाशक्ती असलेले पंतप्रधान ठरले असल्याचे शाह म्हणाले.

विरोधी पक्षांनी केलेला विरोध आणि राज्यसभेतही बहुमत नसताना त्यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोठे आणि कठोर निर्णय घेताना सरकार मागेपुढे पाहणार नाही हे केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांनी सिद्ध केलं असल्याचेही ते म्हणाले.