पाकिस्तानातील पेशावर येथील शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर देशातील सर्व राज्यांना सुरक्षा व्यवस्थेत विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेबाहेर वार्ताहरांना सांगितले. पेशावरमधील शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला होता. शाळेवर दहशतवादी हल्ला झालाच तर तेथून सुटका करून घेण्याची योजना तयार करणे, ओलीस ठेवण्याच्या प्रकारांना कसा आळा घालावा, धोक्याची सूचना देणारी घंटा कशी वाजवावी आणि आणीबाणीच्या स्थितीत दरवाजे आणि प्रवेशद्वार कसे बंद करावे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

देशातील मदरशांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, अशा स्वरूपाची कोणतीही माहिती केंद्र सरकारला मिळालेली नाही. मात्र बांगला देशातील स्थलांतरितांच्या अखत्यारीत असलेल्या पश्चिम बंगालमधील धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक दहशतवादाचे शिक्षण दिले जाते.
-राजनाथ सिंह, केंद्रीयगृहमंत्री