दहशतवाद्यांना आश्रय देऊन जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. काश्मीर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणार अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. परकीय शक्ती जम्मू काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करत आहे. पण आम्ही काश्मीर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढू असे सिंह म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, दहशतवाद्यांना आश्रय देऊन जम्मू काश्मीरसोबत संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. काश्मीर आमचाच असून काश्मिरी जनतादेखील आमची आहे असे त्यांनी पाकला ठणकावून सांगितले.

हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी सबझार भट याला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे संकट निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी रविवारी काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागांत संचारबंदीसदृश निर्बंध लागू करण्यात आले होती. सबझारच्या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते. सोमवारीदेखील जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. काही भागांमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती होती.

राज्यातील परिस्थती तणावाची असतानाही रविवारी काश्मिरातील ८०० तरुणांनी लष्कराच्या सामायिक प्रवेश परीक्षेत भाग घेत दहशतवाद्यांना चपराक लगावली होती. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती तणावाची असतानाच राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केली रविवारी केली होती. सीमा रेषेवर कुरापती सुरुच असून सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावले आहे.