केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरूवारी येथे सांगितले की पोलिसांचे व्यक्तिमत्व म्हाता-या व्यक्तीसारखे नसावे, ते तंदुरूस्त असायला हवेत. ते असेही म्हणाले की, त्यांना पोट वाढलेले पोलिस अजिबात पसंत नाहीत. एकेकाळी स्वत: पोलिस उपनिरीक्षक असलेले शिंदे पुढे म्हणाले, कित्येक वेळा त्यांनी असे अनुभवले आहे की गणवेष घातलेला होमगार्ड सतत एकाच जागेवर उभा असलेला पहायला मिळतो. त्यांचे व्यक्तीगत मत सांगतांना ते म्हणाले की पोलिसाला नेहमी तंदुरूस्त असणे जरूरीचे आहे. नागरिकांना गणवेषधारी पोलिसाकडे पाहिल्यावर असे वाटले पाहिजे की सदर व्यक्ती त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तैनात आहे. पोलिसाचे व्यक्तिमत्व ७५ किंवा ८० वर्षाच्या म्हाता-यासारखे नसावे.
शिंदे यांनी नागरी सुरक्षा दल आणि होमगार्ड यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारंभादिवशी केंद्रीय पोलिस आणि निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिका-यांना संबोधित करताना सांगितले की, उपस्थित सर्व अधिकारी पोलिसांविषयी त्यानी सांगितलेल्या सर्व बाबी ध्यानात ठेवतील. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केली की सध्या अतिशय कमी गणसंख्या असलेल्या नागरी सुरक्षा दलामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने भरती व्हावे. शिंदे म्हणाले, हे एकमात्र असे दल आहे की ज्यास आम्हाला मजबूत आणि अनुशासित करावयाचे आहे. नागरी सुरक्षा दलात जे भरती होतात ते एका सैनिकासारखे कार्य करतांना दिसत नाहीत.
सरकारी आकड्यांनुसार देशभरात नागरी सुरक्षा दलात ५,३५,१५५ नोंदणीकृत जवान आहेत आणि गृह मंत्रालय येणा-या पाच ते दहा वर्षांत यांची संख्या वाढवून एकंदर लोकसंख्येच्या कमीतकमी एक टक्का करण्याची शक्यता आहे. नागरी सुरक्षा संघटनेची १९६२ च्या चीन युद्धानंतर स्थापना करण्यात आली होती. अलिकडेच चीनने केलेल्या घुसखोरीच्या घटनांमुळे नागरी सुरक्षा संघटनेच्या आवश्यकतेचे महत्त्व जाणवते. यातील स्वयंसेवकांना सतत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, जेणेकरून देशातील मानव निर्मीत अथवा नैसर्गिक अशा कुठल्याही प्रकारच्या आपत्तीचा ते सामना करू शकतील. त्यांनी पोलिस आणि निमलष्करी दलांच्या अधिका-यांना सांगितले की, देशात शांतता असली तरी, जवानांनी सदैव तैनात असण्याची गरज आहे, ज्यायोगे आपल्यावर युद्ध लादले गेले तरी आपण सर्वतोपरी तयार असू.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:37 pm