केंद्रीय गृहमंत्रालयाने आम आदमी पक्षाला नोटीस बजावली असून विदेशी देणग्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. १५ दिवसांच्या आत विदेशी देणग्यांबाबत माहिती देण्यात यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. पक्षाला मिळालेल्या देणगीचा आकडा आणि देणगी देणाऱ्या कंपनीची नावे जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कंपनीचे भागधारक आणि फॉरेन इक्विटीबाबतही माहिती द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाकडून ३ मे रोजी पाठवलेली नोटीस पक्षाला आज, शुक्रवारी मिळालेली आहे.

आम आदमी पक्षाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात दिलेली माहिती आणि आकडेवारी यात कोणतीही तफावत आढळून आलेली नाही, असे गृहमंत्रालयाने फेब्रुवारी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात सांगितले होते. एफसीआरएच्या उल्लंघनाबाबत झालेल्या आरोपांमध्ये आपविरोधात काहीही सापडले नाही, असे गृहमंत्रालयाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. आपने विदेशी देणग्यांच्या प्रकरणात नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असेही म्हटल्याचे आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी सांगितले. आपने केवळ भारतातील नागरिकांकडूनच देणग्या घेतलेल्या आहेत, असे त्यावेळी न्यायालयात सांगून क्लीन चिट देणारे गृहमंत्रालय आता पुन्हा या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगत आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत दुःखदायक आहे, असे चढ्ढा म्हणाले. केंद्र सरकारने आपला लक्ष्य करण्यासाठी आपल्या सर्व विभागांचा खुबीने वापर केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयात कालच सीबीआयने छापा मारला. त्यानंतर आज लगेच गृहमंत्रालयाकडून ‘आप’ला नोटीस पाठवण्यात आली आहे. हे राजकीय सूडभावनेतून करण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मंत्री आणि आमदारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच विविध गुन्ह्यांत दाखल केलेले गुन्हे यामुळे अडचणीत सापडलेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत, असे मानले जाते.