विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी गृहमंत्रालयाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने या हिंसाचाराच्या चौकशीसाठी चार सदस्यांचं एक पथक नेमलं आहे. या पथकाकडून आता या हिंसाचाराची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. गेल्या काही दिवसांत राज्यात १४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले. दुसरीकडे, हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्याचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला.


हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, स्वातंत्र्योत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असे नड्डा म्हणाले.

विधानसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरु होतं. काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.

तर पंतप्रधान-राज्यपाल चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.