अनेक स्वयंसेवी संस्थांना कुठल्याही प्रक्रियात्मक आधाराशिवाय एफसीआरए नोटिसा देणाऱ्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने आर्थिक फायद्यासाठी स्वयंसेवी संस्थांना नोटिसा दिल्या होत्या असे समजते. या अधिकाऱ्याचे नाव आनंद जोशी असून त्यांना सीबीआयने अटक केली होती. नंतर गृहमंत्रालयाने त्यांना निलंबित केले होते. जोशी हे गेल्या आठवडय़ात त्यांच्या गाझियाबादमधील इंदिरापूरम येथील घरातून बेपत्ता झाले होते व रविवारी त्यांना टिळकनगर भागात ताब्यात घेण्यात आले व सीबीआय मुख्यालयात जाबजबाबानंतर अटक करण्यात आली. जोशी व काही अज्ञात व्यक्तींनी स्वयंसेवी संस्थांविरोधात प्रक्रियांचे पालन न करता परदेशी देणगी नियंत्रण कायदा (एफसीआरए) नुसार कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परदेशी निधी मिळत असलेल्या स्वयंसेवी संस्थात तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्टचाही समावेश आहे. जोशी यांनी आरोप फेटाळताना या प्रकरणात त्यांच्या वरिष्ठांची नावे घेतली. अतिरिक्त सचिव बी. के. प्रसाद यांनी दबाव आणून स्वयंसेवी संस्थांना दोषमुक्त करण्यास सांगितले होते, असा आरोप जोशी यांनी केला तो प्रसाद यांनी फेटाळला आहे. सेटलवाड यांच्या दोन स्वयंसेवी संस्थांनी एफसीआरएचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणातील फाईल्स गृह मंत्रालयातून गायब झाल्या होत्या. त्या फाईल शोधण्यात आल्या, पण नंतर सीबीआयला या प्रकरणी चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. गृहमंत्रालयाने सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्टची एफसीआरए नोंदणी सरकारने रद्द करण्याचे ठरवले असतानाच त्याबाबतच्या फाईल गायब झाल्या होत्या. समन्स काढूनही उपस्थित न राहिलेल्या जोशी यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयातून गायब असलेल्या फाइल्स या जोशी यांच्या घरी सापडल्या होत्या.