उधमपूरजवळ पाकिस्तानी दहशतवादी उस्मान मोहम्मद नावेद याला पकडून देणाऱया दोन्ही ग्रामस्थांचा साहस पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी सूचना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर सरकारला केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले.
दोन दहशतवाद्यांनी बुधवारी सकाळी उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत शून्य काळात निवेदन देऊन या घटनेबद्दल माहिती दिली. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना शौर्य पुरस्कार देण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उधमपूरजवळी गावातील लोकांनी धोका पत्करून आणि प्राणांची बाजी लावून मोहम्मद नावेद या दहशतवाद्याला पकडले आणि पोलीसांच्या हवाली केले. यामुळे या दोन्ही ग्रामस्थांचा साहस पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी सूचना राज्य सरकारला करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांविरोधात जम्मूमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मोहम्मद नावेदची सध्या चौकशी करण्यात येते आहे. तो पाकिस्तानातील फैसलाबादमधून भारतात आला असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.