सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीने चालवलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांना गृहमंत्रालयाने परकीय चलन नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी नोटीस दिली असून, त्यावर पंधरा दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
तिस्ता व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या सबरंग ट्रस्ट व सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस (सीजेपी) या स्वयंसेवी संस्थांना नोंदवह्य़ा व लेखापुस्तिका पाहून गृह मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी नोटीस जारी केली आहे. एप्रिलमध्ये ही तपासणी करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे कम्युनॅलिझम कॉम्बॅट नियतकालिकाचे सहसंपादक होते तसेच मुद्रक व प्रकाशकही होते. सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि या संस्थेच्या नावाखाली ते चालवले जात होते व त्याला परदेशी देणग्या मिळालेल्या होत्या. परकीय चलन नियंत्रण कायद्यानुसार कुठल्याही स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, प्रकाशक,
मुद्रक, प्रतिनिधी, संपादक यांना परदेशी देणग्या स्वीकारता येत नाहीत.
सीजेपी ही संस्था २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांच्या बाजूने खटले लढत आहे. या संस्थेला २००८-०९ व २०१३-१४ दरम्यान १.१८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यातील ८० टक्के रक्कम म्हणजे ९५ लाख रुपये कायदेशीर सल्ल्यासाठी वापरण्यात आली.
शैक्षणिक व आर्थिक कारणांसाठी स्थापन केलेल्या संस्थेला कायदेशीर सल्लामसलतीसाठी सामाजिक
या शीर्षांअंतर्गत परदेशी पैसा देण्यात आला त्यामुळे परकीय चलन नियंत्रण कायद्याचा भंग झाला आहे.