भारतीय बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रर्त्यार्पणासाठी ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. ब्रिटनधील गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गृहसचिवांनी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर सही केली आहे. विजय मल्ल्या प्रत्यापर्पणाला आव्हान देऊ शकतो. यासाठी त्याच्याकडे 14 दिवसांची मुदत आहे. विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय लंडन कोर्टानं सुनावला होता. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देत लंडनच्या न्यायालयाने निर्णय दिला होता.

विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे.

विजय मल्याला ठेवण्यात येणारी जागा सामान्य कैद्यांपासून दूर असणार आहे. सामान्य कैदी आणि त्याच्यात एक मोठी सुरक्षा भिंत असणार आहे. या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे असून, पोलिसांचा सतत पहारा असतो. कसाबच्या सुरक्षेसाठी बराक क्रमांक 12 ला आग आणि बॉम्बपासून सुरक्षित करण्यात आलं होतं. पहिल्या माळ्यावर जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं तिथे सध्या 26-11 चा हॅण्डलर अबु जिंदालला ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत अजूनही काही कैदी आहेत.

2 मार्च २०१७ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती. यानंतर विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने प्रयत्न सुरु केले होते. अखेर या प्रयत्नांना यश आलं आहे.