मुंबईसारख्या शहरात घर घेणे परवडत नाही असे आपण अनेकदा म्हणतो. पण त्याच वेळी अमेरिका म्हणजे सारे काही आलबेल असलेला देश आहे, असे आपले भाबडे मत असते. या मतालाच छेद देणारे सर्वेक्षण अभ्यासातून पुढे आले आहे. अमेरिकेतही निवाराविहिनांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
विशेषत: शहरी भागात हे चित्र असल्याचे अमेरिकेतील महापौरांच्या परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अन्नाच्या  मागणीतही वाढ
अमेरिकेच्या १८ राज्यांमधील सर्व शहरांचे सर्वेक्षण केले असता सरकारकडे केल्या जाणाऱ्या अन्नाच्या मागणीतही वाढ झाल्याचे आढळून आले आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ सात टक्क्यांनी झाल्याचे महापौर परिषदेच्या अहवालात म्हटले आहे.
 आपत्कालीन परिस्थितीत जवळचा साठा संपलेला असताना शहरांकडून केल्या जाणाऱ्या मागणीच्या नोंदी या वेळी विचारात घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अन्नाची सरकारकडे मागणी करणाऱ्यांपैकी ४३ टक्के लोकांना रोजगार आणि नियमित वेतन मिळत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.