संघाचे मत; विषयाच्या उदात्तीकरणाचा हेतू नाही
समलैंगिकता हा गुन्हा नाही, मात्र सामाजिकदृष्टय़ा अनैतिक कृत्य आहे असे मत संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी होसबळे यांनी एका परिषदेत बोलताना समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ट्वीटद्वारे या विषयाचे उदात्तीकरण करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले.
समलैंगिकता हा गुन्हा नाही. त्याला शिक्षा देण्याची गरज नाही. मात्र सामाजिकदृष्टय़ा ते अयोग्य असून, मनोरुग्ण म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल असे त्यांनी ट्ीवट केले. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गुन्हेगारी किंवा त्याचे उदात्तीकरणाचा असू नये. समलैंगिक विवाहामुळे समलैंगिकतेचे स्थायीकरण होत आहे. याला पायबंद घालायला हवा असे मत व्यक्त केले.
गुरुवारी एका कार्यक्रमात होसबळे यांना समलैंगिकता गुन्हा आहे काय? असे विचारता, समाजातील इतरांवर त्याचा परिणाम होत नसेल तर गुन्हा मानू नये असे मत होसबळे यांनी व्यक्त केले होते. लैंगिकतेशी संबंधित बाबी या खासगी आणि व्यक्तिगत आहेत. सार्वजनिक व्यासपीठांवर संघाने आपले मत का द्यावे असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला होता. याबाबत लोकांनीच काय ते ठरवावे. घटनेच्या कलम ३७७ नुसार समलैंगिकता अनैसर्गिक व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य मानले जात असून, त्यासाठी कमाल १० वर्षांचा कारावास होऊ शकतो. मात्र समलैंगिकता गुन्हेगारी मानू नये अशी मागणी देशातून होत आहे. गेल्या आठवडय़ात माजी मंत्री व काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी समलैंगिकतेचा गुन्हा मानला जाऊ नये यासाठी लोकसभेत विधेयक आणले होते, मात्र त्याला विरोध झाला होता.