लैंगिक गरजा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये RSS यावर चर्चा होत नाही आणि त्यावर संघाचे काही मतही नाही. समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येऊ नये. पण ते अनैतिक आहे, असे आपले मत असल्याचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितले. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.
‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना होसबाळे यांनी सांगितले की, लैंगिक गरजा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सार्वजनिक कार्यक्रमात कशासाठी मत व्यक्त करावे? त्यावर संघाचे म्हणून काहीही मत नाही. यावर प्रत्येक व्यक्तीने निर्णय घ्यायला हवा. या विषयावर संघाच्या बैठकांमध्ये कधीही चर्चा होत नाही आणि होणारही नाही.
भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७७ नुसार समलैंगिकता हा गुन्हा असून, ते निसर्गाच्याविरूद्ध असल्यामुळे त्याबद्दल गुन्हेगाराला जास्तीत जास्त दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, समलैंगिकता गुन्हा ठरवू नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर होसबाळे म्हणाले, समाजातील इतर लोकांवर त्याचा परिणाम होत नाही, तोपर्यंत समलैंगिकता गुन्हा ठरविण्यात येऊ नये, असे आपल्याला वाटते.