21 November 2017

News Flash

मधु इथे अन् चंद्र तिथे

विवाहाआधीपासून ‘नवराई’ आणि ‘नवरोबा’ यांच्या थट्टा-मस्करीसाठी नातेवाईकांकडून चघळला जाणारा आणि विवाहानंतर आयुष्यभराचा आठवण ठेवा

पीटीआय , मेलबर्न | Updated: December 4, 2012 3:15 AM

विवाहाआधीपासून ‘नवराई’ आणि ‘नवरोबा’ यांच्या थट्टा-मस्करीसाठी नातेवाईकांकडून चघळला जाणारा आणि विवाहानंतर आयुष्यभराचा आठवण ठेवा म्हणून नवदाम्पत्याचा महत्त्वपूर्ण सोहळा गणला जाणारा मधुचंद्र हा म्हटला जातो तितका गोंडस नसतो, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. विवाहानंतरचा मधुचंद्राचा काळ हा एकमेकांना समजून घेण्याचा, आनंदाचा.. त्यासाठी हौशी जोडपी अगदी परदेशवारीही करतात. पण खरे सांगायचे तर विवाहाच्या पहिल्या वर्षांतील हा काळ सुखाचा वगैरे काही नसतो; उलट या संपूर्ण वर्षांत ते जोडपे आनंदी नसते, असे अभ्यास म्हणतो. थोडक्यात आपण मधुचंद्राची कितीही महती सांगत असलो तरी त्या दोघांची स्थिती ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ अशीच असते, असे म्हणायला हरकत नाही.
ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या अभ्यासात असे निष्पन्न झाले की, विवाहबंधनात चाळीस वर्षे पूर्ण झालेले पती-पत्नी हे जास्त सुखी असतात. ऑस्ट्रेलियाच्या डिकीन विद्यापीठातील ‘सेंटर ऑन क्वालिटी ऑफ लाइफ’ या संस्थेने हा अभ्यास केला असून त्यात किमान दोन हजार लोकांचे सुख-समाधान ०-१०० या मोजपट्टीवर बघितले गेले, असे ‘द सिडनी मॉर्निग हेराल्ड’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन लोकांनी या मोजपट्टीवर सरासरी ७५ गुण पटकावले असले, तरी ज्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण झाले आहे त्यांचे गुण हे ७३.९ आहेत, तर ज्यांच्या विवाहाला ४० किंवा त्याहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना ७९.८ गुण मिळाले आहेत.
नवविवाहित जोडपी ही सुखाच्या परमोच्च शिखरावर असतात अशी एक समजूत आहे, पण वास्तव त्यापेक्षा फार वेगळे आहे, असेच या अभ्यासातून दिसून आल्याचे प्रमुख लेखक मेलिसा वेनबर्ग यांनी म्हटले आहे.
आपल्या विवाहाचा दिवस हा आयुष्यातील सर्वोत्तम, सर्व सुखाचा दिवस असेही काही लोकांना वाटते. विवाहाचा दिवस हा उत्कंठावर्धक असतो हे खरे, पण त्यानंतर त्या जोडप्याजवळ सरते शेवटी उरतात ते फोटो, व्हिडीओ व बिलांचे गठ्ठे. त्याच्या जोडीला एका वास्तवाची जाणीव असते ती म्हणजे बऱ्या किंवा वाईटासाठी आपण आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे वेनबर्ग यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या एका संशोधनात असे दिसून आले की, विवाहोत्तर नैराश्यातून जोडपी दुसऱ्या वर्षी बाहेर पडतात व त्यांचा सुखांक हा ७८.४ असतो. विवाहित लोक हे घटस्फोटित, विधवा, विधुर व अविवाहित यांच्यापेक्षा सुखी असतात. जी जोडपी एकमेकांपासून दूर होतात, ती सर्वात असमाधानी, दु:खी असतात. त्यांचा सुखांक कमी म्हणजे ६९.२ इतका असतो. विवाहित स्त्रिया पुरुषांपेक्षा सुखी असतात.     

काय म्हणतायत संशोधक?
नवविवाहित जोडपी ही सुखाच्या परमोच्च शिखरावर असतात अशी एक समजूत आहे, पण वास्तव त्यापेक्षा फार वेगळे आहे, असेच या अभ्यासातून दिसून आल्याचे प्रमुख लेखक मेलिसा वेनबर्ग यांनी म्हटले आहे.

First Published on December 4, 2012 3:15 am

Web Title: honeymoon period is a myth study
टॅग Honeymoon,Research