‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक कन्या हनीप्रीत हिने पंचकुला येथे हिंसाचार घडवून आणण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रूपये वाटल्याची माहिती समोर आली आहे. २५ ऑगस्टला विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात बाबा राम रहिमला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला परिसरातील त्याच्या समर्थकांचा जमाव आक्रमक झाला होता. या जमावाने मोठ्या प्रमाणावर नासधूस आणि जाळपोळ केली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात ३५ जणांचा बळी गेला होता. हे सर्व हनीप्रीतने घडवून आणल्याचा दावा हरयाणा पोलिसांनी केला आहे. त्यासाठी तिने ‘डेरा सच्चा सौदा’च्या चमकोर सिंग व दान सिंग या दोन अनुयायांच्या माध्यमातून १.२५ कोटी रूपये हल्लेखोर लोकांना दिले होते. सध्या हनीप्रीत पोलीस कोठडीत आहे. यावेळी करण्यात आलेल्या तिच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली. तर चमकोर सिंग आणि दान सिंग यांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असून ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

राम रहीम माझ्याशी फ्लर्ट करायचा, मॉडेलने केला आरोप

३८ दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या हनीप्रीतला मंगळवारी दुपारी पंजाबमधील झिरकापूर – पतियाळा रस्त्यावरुन अटक करण्यात आली होती. बुधवारी हनीप्रीतला हरयाणातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. मात्र, हनीप्रीत चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तिच्याकडून सातत्याने दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. बाबा राम रहिमला दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या ४३ मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी हरयाणा पोलिसांनी जाहीर केली होती. यामध्ये हनीप्रीत आणि आदित्य इन्सान यांचाही समावेश होता. हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा असली तरी मी नेपाळला गेले नाही, असा दावा हनीप्रीतने चौकशीदरम्यान केल्याचे समजते. पंजाबमधील भटिंडा येथील ‘डेरा’ समर्थकाच्या घरात लपून बसले होते, असे तिने पोलिसांना सांगितले.

राम रहिम, हनीप्रीतकडे संयुक्त राष्ट्र संघानं मागितला पाठिंबा