डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमची मुलगी हनीप्रीत इन्सा अखेर जगासमोर आली आहे. महिन्याभरापूर्वी राम रहिमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. आता हनीप्रीत न्यायालयासमोर शरण येण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात हनीप्रीतच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता.

राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवल्यानंतर हरयाणात हिंसाचार उसळला होता. यानंतर डेरा सच्चा सौदाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली. हनीप्रीत इन्सालाही हिंसाचार प्रकरणात अटक होणार होती. मात्र अटकेच्या भीतीने हनीप्रीत २५ ऑगस्टला फरार झाली होती. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याची मोठी चर्चा होती. मात्र मी नेपाळला गेले नव्हते, मी भारतातच होते, असे तिने ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

आपण कोणताही गुन्हा केलेला नसल्याचा दावा हनीप्रीतने केला. ‘सत्याचा विजय होईल आणि जग हे सर्व पाहिल. ज्या काही गोष्टी आमच्यासोबत घडल्या आहेत, त्यामुळे मला धक्का बसला आहे. आम्ही देशभक्त असून आमचे देशावर प्रेम आहे,’ असेही हनीप्रीतने म्हटले. यावेळी तिने राम रहिमच्या कथित संबंधांवरदेखील भाष्य केले. ‘बाप आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्यात आला आहे. माध्यमांतून बाप आणि मुलीचे नाते अत्यंत चुकीच्या पद्धतीने जगासमोर दाखवले गेले आहे,’ अशा शब्दांमध्ये हनीप्रीतने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘एक बाप त्याच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही का? एक बाप त्याच्या मुलीवर प्रेम करु शकत नाही का?,’ असे प्रश्न तिने उपस्थित केले.

राम रहिमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता. याशिवाय हा कट फसल्यावर हरयाणात हिंसाचार करण्याच्या सूचना देऊन जाळपोळ घडवून आणण्यात आली, अशीही माहिती समोर आली होती. याबद्दल हनीप्रीतने स्पष्टीकरण दिले. ‘एक मुलगी इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना वडिलांना पळवून कशी नेऊ शकते? माझ्याविरोधात काही पुरावे आहेत का? हरयाणातील दंगलींमध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता,’ असे हनीप्रीतने म्हटले.