हाँगकाँगच्या विमानतळ प्राधिकरणाने एअर इंडियाच्या विमानांवर पुन्हा एकदा १४ दिवसांसाठी बंदी घातली आहे. एअर इंडियाच्या विमानातून आलेले काही प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हाँगकाँगच्या विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. हाँगकाँगने पाचव्यांदा एअर इंडियाच्या विमानांवर बंदी घातली आहे.

७२ तासांपूर्वी तपासणी करून करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांनाच भारत-हाँगकाँग प्रवासाची परवानगी असेल, असा नियम हाँगकाँग सरकारने जुलैमध्ये जाहीर केला होता. त्याप्रमाणे सर्व प्रवाशांची हाँगकाँग विमानतळावर पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येते. या आठवड्यात एअर इंडियाच्या विमानातून हाँगकाँगला आलेले काही प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे १४ दिवसांसाठी एअर इंडियाच्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


याआधी एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानांवर २० सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर, १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट आणि १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर अशी तीनवेळा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर चौथ्यांदा १० नोव्हेंबरपर्यंत आणि आता पुन्हा एकदा पाचव्यांदा १४ दिवसांसाठी म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.