हाँगकाँगमधील निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या तरुण पिढीने चीनला दणका दिला आहे. २०१४ मध्ये लोकशाही समर्थकांनी मोर्चे काढले होते. त्यानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये चीनला विरोध असणाऱ्या तरुणांनी बाजी मारली. २२ लाख लोकांनी मतदानात भाग घेतला. निम्न स्वायत्त असलेल्या हाँगकाँगवर चीन त्याचे पाश आवळत असताना निवडणुकीत तरुण राजकीय नेत्यांनी बाजी मारली आहे.

१९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँगचा ताबा चीनला दिल्यानंतर मतदानास एवढा प्रतिसाद प्रथमच मिळाला आहे. चीन व हाँगकाँग यांच्यातील तणाव शिगेला असताना निवडणुकीत चीनला दणका मिळाला. हाँगकाँगचे स्वातंत्र्य पन्नास वर्षांसाठी सुरक्षित राहील असे करारात म्हटले होते, पण तसे होत नसल्याचे चित्र आहे. एक देश व दोन प्रणाली यावर तरुणाचा विश्वास उरला नव्हता. हाँगकाँगला अधिक स्वातंत्र्याची त्यांची मागणी आहे. राजकीय सुधारणांसाठी २०१४ मध्ये हाँगकाँगमध्ये आंदोलने करण्यात आली होती. अनेक राजकीय पक्षांनी स्वायत्ततेची मागणी केली होती. आताच्या निवडणुकीत नव्या दमाचे चार उमेदवार विजयी झाले असून पाचवा विजयाच्या मार्गावर आहे. नाथन लॉ हा २०१४ मधील अंब्रेला मुव्हमेंटचा नेता मतदारसंघात विजयी झाला आहे. हाँगकाँगमध्ये पाच भौगोलिक मतदारसंघ असून कायदेमंडळाच्या अनेक जागा आहेत. चीनपासून फुटून निघण्यासाठी जनमताची मागणी लॉ व त्यांच्या डेमोसिस्टो पक्षाने केली आहे. हाँगकाँगच्या लोकांना बदल हवा आहे असे लॉ यांनी सांगितले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरोधात एकजुटीने लढले पाहिजे असे लॉ यांचे मत आहे. चीनच्या हाँगकाँगमधील हस्तक्षेपास तरुण नेत्यांचा विरोध आहे. तेथे लोकशाहीवादी दोन गट असून, एका गटास स्वातंत्र्य शक्य वाटते तर दुसऱ्या गटाला पूर्ण स्वातंत्र्य शक्य वाटत नाही.