‘ऑनर किलिंग’वर आधारित ‘सैराट’ चित्रपटासारखीच घटना दिल्लीत प्रत्यक्षात घडली आहे. १८ वर्षांच्या तरुणाने त्याच्या मेहुण्याची हत्या केली असून बहिणीने दुसऱ्या जातीतील तरुणाशी विवाह केल्याने तो नाराज होता. त्याने बहिणीची हत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एकाने त्याच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावली आणि बहिणीचा जीव वाचला.

दिल्लीत राहणाऱ्या रुकैय्या खातून या तरुणीने एप्रिल २०१७ मध्ये मोहम्मद आतिफ या तरुणाशी विवाह केला. मोहम्मद हा २६ वर्षांचा असून तो दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे रुकैय्याच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता. आई-वडिलांच्या भीतीपोटी रुकैय्याने ती कुठे राहते, याचा पत्ता देखील कोणालाही दिला नव्हता. मात्र, रुकैय्याचा भाऊ मोहम्मद अक्रम हा तिच्या संपर्कात होता. ‘तो आम्हाला त्याच्या कॉम्प्यूटर क्लासजवळ भेटायला बोलवायचा. आई- वडिलांसारखा त्याने कधीच विरोध दर्शवला नव्हता. त्यामुळे मला त्याच्यावर संशय देखील आला नाही. रविवारी त्याने नेहमीप्रमाणे आम्हाला क्लासजवळ बोलावले. आमच्या गप्पा सुरु असताना त्याने बॅगेतून रिव्हॉल्वर काढली आणि माझ्या पतीवर गोळ्या झाडल्या, असे रुकैय्याने माध्यमांना सांगितले.

मोहम्मद अक्रमने माझ्यावरही गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या एका मित्राने रिव्हॉल्वर हिसकावली आणि मी वाचले, असे तिने सांगितले. यानंतर मोहम्मदने बहिणीवरच पतीच्या हत्येचा आरोप केला. कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात जाऊन तू लग्न केले. म्हणून मी त्याची हत्या केली, असे मोहम्मदने सांगितले आणि तो घटनास्थळावरुन पळून गेला.

सोमवारी पोलिसांनी मोहम्मद अक्रमला अटक केली. ‘माझे वडिलच या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनीच अक्रमच्या मदतीने माझ्या पतीची हत्या केली’, असा आरोप रुकैय्याने केला आहे. १८ वर्षांपूर्वी माझे वडील आणि काकांनी मिळून माझ्या चुलत बहिणीची देखील हत्या केली होती. चुलत बहिणीने देखील त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले होते, असा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी मात्र याबाबत तपास सुरु असल्याचे सांगितले.